ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!
कधि लवचिक पाते खड्गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.
मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.
चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.
वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.
चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान् मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!
हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!
थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन् आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.
पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषात!
रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!
क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.
संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!
Thursday, April 26, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
Apratim kavita. Krupaya ya kavitecha sandharbh thodkyat namood karta ala tr aankhi chhan jaanun gheta yeil. Aabhari aahe ☺️🙏
5th Stanza...mala wattay mistake aahe...last word 'khali' asava
अप्रतिम कविता आहे. कुसुमाग्रजांनी सर्प हे सत्तेला दिलेले रूपक आहे. आणि नकुल म्हणजे मुंगूस हे त्या सर्पा वर म्हणजेच अन्यायावर मात करणारे दाखवले आहे..!!
कुसुमाग्रज यांच्या कविता अतिशय छान आहे.
क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार या ओळीत तो शब्द लिहिलेला आहे तो चुकीचा आहे तिथे कृपया ती विषधार अशी दुरुस्ती करावी
Post a Comment