Friday, April 27, 2007

जोगीण

साद घालशील
तेव्हाच येईल!
जितक मागशील
तितकच देईन!!

दिल्यानंतर
देहावेगळ्या!
सावली सारखी
निघून जाईन!!

तुझा मुगुट
मागणार नाही!
सभेत नातं
सांगणार नाही!!

माझ्यामधल्या
तुझेपणात!
जोगीण बनून
जगत राहीन!!

माझ्या मातीचे गायन

माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रृतींनी
जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे ?

माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून, कधी पाहशील का रे ?

माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनार्‍यास दिवा, कधी लावशील का रे ?

माझा रांगडा अंधार, मेघा मेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी, कधी टिपशील का रे ?

Thursday, April 26, 2007

गगनामधल्या सात ऋषींना

गगनामधल्या सात ऋषींना
एक पहाटे विचारलें मी
तुमचा माझा प्रवास चाले
तिमिराने भरलेल्या व्योमीं
या मातीचें
मजला बंधन
तुम्ही नभांतिल
मुनी सनातन
या फिरण्याचा हेतु तुम्हांला
काय गवसला?

एक ऋषी मुख वळवुनि मागे
खिन्न स्वराने मला म्हणाला,
हेतु कळता, प्रवास तर हा
कधीच असता समाप्त झाला_
जन्म जाहला
गतींत आमुचा
अंतही आहे
गतींत आमुचा
हेतुहीन या गतींत आहे
तुमचा आमुचा प्रपंच सारा
गुरफटलेला.

जीवन-लहरी

रात्र अशी अंधेरी
तेवत ना दीप कुठे
चुकलेली चाकोरी
अंथरले पथि काटे
तूच इथे पाठविले
तूच दिवे मालविले
पंकी पद पडता मग
बघशी का रागाने?

आशा रात्री रचते
वैभवशाली नगरी
अनुभव परि तुडवित ती
येतो दिवसा दारी
करुनीया विकट हसे
आशेला आणि पुसे
वेड्यापरि बसशी का
रात्रीची जागत तू?

मातीचा इमला हा
कणकण हळु ढासळतो
अविरत नद काळाचा
भवताली फेसाळतो
लाटा उठती,फुटती
भिंती पडती,बुडती
अन्ती अवशेष नुरे
हीच असे का नियती!

अहि-नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!

कधि लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात!

रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!

क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.

संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!

माळ

आडवाटेला दूर एक
तरु त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिपिंत जीवनाशी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरुवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरु वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेई उडवूनी त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडल्या वरतून पर्ण राशी

चंद्र

असे अनेक चंद्र येउन गेले...
चांदणं देउन गेले,
पण....
चांदणं देण्यासाठी
त्यांनी मागितलं होतं मोल....
माझ्या आकाशाचं....
पण तुझा चंद्र..
इतका आत्ममग्न,इतका निस्वार्थ,
कि त्यानं माझं आकाश तर राहोच ....
पण माझा अंधारही नाही मागितला

वादळवेडी

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात

कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात

तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात

सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकान्ची होय दाट गर्दी
प्रभादिपान्ची फ़ुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी
कोपर्याशी गुणगुणत अन अभन्ग
उभा केव्हाचा एक तो अपन्ग
भोवतीचा अन्धार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला
जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसान्चा त्यात ही उपास
नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला
तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दिना त्या उभारुनी उर
म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी
खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिन बन्धू वाट
आणी धनिकान्ची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात.

म्हणेन

समज-रंग जळत्या सोन्याचा
हो.उनि मी मद्यामधि भरलो
समज मी काजळ होऊन
नायकिणींच्या नयनी शिरलो

समज जरी भ्रमरपणाने
रसगंधाचे प्यालो दहिवर
अशातशांच्या सराईत वा
समज टेकलो या रस्त्यावर -

असेल साहस या सर्वातुन
दुर्बळतेला करावयाचे
मरणाच्या छायेमधि अथवा
थोडे जादा जगावयाचे.

असेल हेही असेल तेही
वा मातीची फ़क्त उधाणे
असेल अथवा पोकळतेवर
विणावयाचे रंगीत गाणे.

असेल काही - पण पलिकडचा
मी जर तुजला दिसलो नाही
म्हणेन परिचय झाला अपुला
परंतु ओळख झाली नाही.

पुनव

आज कार्तिकी पुनवेवरती
श्वेतकमल तव समीपतेचे
फ़ुलले आहे
कलहंसापरि हास्य रेशमी
संगमरवरी या स्तंभावर
बसले आहे.

अवकाशातील निळ्या रुपेरी
कळीकळीवर
आर्त तुझ्या द्रृष्टीतिल पडले
आहे दहिवर.

मंदोत्कट वाऱ्याने लहरत
अशब्द हो.उनि अवघडलेली
झाडे हलती
त्या पर्णांतुनि तव शब्दांपरि
पराग काही चंद्रफ़ुलांचे
खाली गळती.

तुझेपणाचे रुप दावण्या
दूरपणातुन
आज जाहले विलग चांदणे
चंद्रापासून.

निराकार

या दु:खाला नाही आकार
नाही रंग नाही नाव -
ते आहे माझे
पण मी नाही ओळखत त्याला
आणि नसशिल ओळखत तूही
मला माहित आहे इतकेच -
तुझा रुपेरी रथ दूर जात असता
या क्षितिजावर जो तरंगत होता
निळापांढरा मेघ
त्या मेघातच जन्म झाला या दु:खाचा
आणि त्या मेघाप्रमाणेच
ते फ़िरते आहे आकाशाच्या पोकळीत
शोधीत स्वत:साठी
एखादे नाव , एखादी रेषा -
एखादी आकृती.

नाही...

काही बोलायचे आहे
पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये
भक्ति तोलणार नाही

माझ्या अन्तरन्गात गन्ध
कल्प्कुसुमन्चा दाटे
पण पाकळी तयाची
कधी फ़ुलणार नाही

नक्षत्रान्च्या गावातले
मला गवसले गुज
परि अक्षरान्चा सन्ग
त्याला मिळणार नाही

मेघ जाम्भळा एकला
राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला
कधी कळणार नाही

दूर बन्दरात उभे
गलबत रुपेरी
त्याचा कोश किनारयास
कधी लाभणार नाही

तुझ्या क्रुपाकटाक्षाने
झालो वण्व्याचा धनी
त्याच्या निखारयात तुला
कधी जाळणार नाही

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

पाऊलचिन्हे

परमेश्वर नाही, घोकत मन मम बसले ।
मी एक रात्री, त्या नक्षत्रांना पुसले ॥
परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी ।
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले ॥ १ ॥

स्मित करून म्हणल्या मला चांदण्या काही ।
तो नित्य प्रवासी फिरत सदोदित राही ॥
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे ।
त्यांनाच पुससी तू, आहे तो की नाही ॥ २ ॥

कधी तुझ्यास्तव

कधी तुझ्यास्तव
मनांत भरते
मेघ पिणारे
चांदल नाते
दवांत जे घर
बांधुनि राही
पण ते नाही
प्रेम वगैरे!

तव शरीरातुन
कधी पेटती
लाल किरमिजी
हजार ज्योती
त्यात मिळाया
पतंग होतो
परी नसे तो
काम वगैरे!

कधी शिवालय
पांघरुनी तू
समोर येता
विरती हेतू
मनात उरते
मात्र समर्पण
मी नसतो पण
भक्त वगैरे!

रंगीत असले
धुके धराया
सार्थ शब्द हे
अपरे वाया
त्या पलिकडचा
एक जरासा
दिसे बरासा
फक्त वगैरे!

Sunday, April 15, 2007

कणा!

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे, सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा!
फक्‍त लढ म्हणा!!

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका

स्मरशील का रे

स्मरशील राधा स्मरशील यमुना
स्मरशील गोकुळ सारे
स्मरेल का पण कुरूप गवळण
तुज ही जगदीशा रे ?


रास रंगता नदीकिनारी
उभी राहिले मी अंधारी
न कळत तुजला तव अधरावर
झाले मी मुरली रे !


ऐन दुपारी जमीन जळता
तू डोहावर शिणून येता
कालिंदीच्या जळात मिळुनी
धुतले पाय तुझे रे.


सांजकाल कधी टळून गेला
तरी न माधव परतुनि आला
किरण दिव्याचा होऊनिया मी
जळत पथी बसले रे !


मथुरेच्या त्या राजघरातुन
कुंजवनी परतता तुझे मन
उपहसास्तव तरी कधी तू
आठव करशिल का रे ?

प्रेम कर भिल्लासारखं...

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं...

जखमांचं देणं

आकाशपण
हटता हटत नाही
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही.

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

वादळला हा जीवनसागर

वादळला हा जीवनसागर - अवसेची रात
पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात

भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा
सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्री
वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती

परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात
स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो~यात
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात

युगामागुनी चालली रे युगे ही

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

दूरस्थ कुणी

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"