Thursday, April 26, 2007

जीवन-लहरी

रात्र अशी अंधेरी
तेवत ना दीप कुठे
चुकलेली चाकोरी
अंथरले पथि काटे
तूच इथे पाठविले
तूच दिवे मालविले
पंकी पद पडता मग
बघशी का रागाने?

आशा रात्री रचते
वैभवशाली नगरी
अनुभव परि तुडवित ती
येतो दिवसा दारी
करुनीया विकट हसे
आशेला आणि पुसे
वेड्यापरि बसशी का
रात्रीची जागत तू?

मातीचा इमला हा
कणकण हळु ढासळतो
अविरत नद काळाचा
भवताली फेसाळतो
लाटा उठती,फुटती
भिंती पडती,बुडती
अन्ती अवशेष नुरे
हीच असे का नियती!

No comments: