Thursday, April 26, 2007

गगनामधल्या सात ऋषींना

गगनामधल्या सात ऋषींना
एक पहाटे विचारलें मी
तुमचा माझा प्रवास चाले
तिमिराने भरलेल्या व्योमीं
या मातीचें
मजला बंधन
तुम्ही नभांतिल
मुनी सनातन
या फिरण्याचा हेतु तुम्हांला
काय गवसला?

एक ऋषी मुख वळवुनि मागे
खिन्न स्वराने मला म्हणाला,
हेतु कळता, प्रवास तर हा
कधीच असता समाप्त झाला_
जन्म जाहला
गतींत आमुचा
अंतही आहे
गतींत आमुचा
हेतुहीन या गतींत आहे
तुमचा आमुचा प्रपंच सारा
गुरफटलेला.

No comments: